जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 6 October 2015

गणित प्रश्न संच निर्मिति समिती

सर्वांना नमस्कार,

इयत्ता 1 ते 8 साठी प्रश्नसंच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्यापरिषद), पुणे वेबसाईटवर

http://www.mscert.org.in/QuestionBank.aspx

 (विद्यापरिषदेचे तज्ज्ञ व अधिकारी, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनमधील तज्ज्ञ, डाएटमधील प्राध्यापक व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून हे प्रश्नसंच तयार केलेले आहेत.)
अपलोड करणे सुरू झाले आहे.

पायाभूत चाचण्या बऱ्याच ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यात, वेळापत्रकात, चाचणी घेण्यात, तपासण्याच्या पद्धतीत काही अडचणी आल्या आहेत असे समजते. त्यातील जास्तीत जास्त अडचणी आपण पुढील वेळी दुरूस्त करू.

सगळीकडून एक मत मात्र ऐकायला मिळत आहे आणि ते म्हणजे या चाचण्यांमधील प्रश्न फार चांगले आहेत. मुलांबद्दल नेमकी माहिती समजते आहे. ज्या मुलांना काहीच येत नाही असे वाटते त्यांना काय काय येते हे देखील चाचणीतून समजत आहे. आपल्या वर्गाची अडचण नेमकी काय आहे ते ओळखायला शिक्षकाला मदत होईल अशा प्रकारचे प्रश्न यात आहेत. या प्रश्नांचे शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. अशा प्रकारचे प्रश्न असलेले प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची सूचनाही अनेकांनी केली.

त्यासाठी गणिताचे प्रश्नसंच तयार करीत आहोत. यात अभ्यासक्रमातील क्षेत्रांनुसार प्रश्नसंच आहेत. इयत्तावार पाठ्यपुस्तकाचा संदर्भही दिलेला आहे. काही संकल्पनांचे प्रश्न मात्र एकत्रितपणे दिलेले आहेत. सध्या प्रामुख्याने पहिल्या सत्राचे मराठी माध्यमाचे काम केलेले आहे. इतर माध्यमांचे आणि इतर प्रश्नसंचांचे काम टप्प्याटप्प्याने करून वेबसाइटवर अपलोड केले जाईल.

प्रात्यक्षिक, तोंडी, लेखी असे तीनही प्रकारचे प्रश्न यात आहेत. प्रश्न सोडवता सोडवता संकल्पना व कौशल्ये विकसित व्हावीत असेही प्रश्न यात आहेत.


काही ठिकाणी कॅलक्युलेटरचा उपयोग करण्यास सुचविले आहे. उदा. निरनिराळ्या वर्तुळाकार वस्तूंचा परीघ आणि व्यास मुलांनी स्वतः मोजावा, त्यांचे गुणोत्तर कॅलक्युलेटर वापरून काढावे, सर्व वर्तुळांना ते गुणोत्तर जवळपास सारखे येते याचा अनुभव स्वतः घेऊन अचंबित व्हावे आणि त्यांचे पुढे आणखी शोध घेण्याचे कुतुहल वाढावे असा प्रयत्न आहे. दशांशांचा भागाकार ही क्षमता या अनुभवात प्राधान्याची मानलेली नाही आणि म्हणून कॅलक्युलेटर वापरावयास सांगितले आहे. दशांशाचा सराव हा स्वतंत्रपणे घ्यावा, परंतु नव्या अनुभवातला तो अडथळा बनू नये असा विचार यामागे आहे. आकडेमोडीत न अडकता एखाद्या नव्या संकल्पनेतली प्रक्रिया आणि रीत याकडे मुलांचे लक्ष वेधता यावे यासाठीही काही ठिकाणी कॅलक्युलेटरचा वापर सुचवलेला आहे. मूळ अवयव पाडणे, घातांक. अपरिमेय संख्या यासारख्या संकल्पना शिकताना उपयोगी पडणारे साधन म्हणून तो वापर केलेला आहे.

पाठ्यपुस्तकांमधील प्रश्नांचा संदर्भही या प्रश्नसंचांमध्ये दिलेला आहे. ते प्रश्नही करून घ्यावेत. या प्रश्नसंचातलेच प्रश्न संकलित 1 व 2 ला येतील असे नाही. या प्रकारचे किंवा यापेक्षा निराळे प्रश्नही येऊ शकतील. परंतु या प्रश्नांचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना फायदा होईल अशी खात्री वाटते. या प्रकारचे प्रश्न मुलांच्या परिसराशी जोडून, मुलांची नावे वापरून विचारावेत.

या सत्रातही मुलांना त्यांचा फायदा व्हावा यासाठी जसजसे प्रश्नसंच तयार होतील तसतसे ते वेबसाइटवर अपलोड करणार आहोत. हे ‘work in progress’ आहे. त्यात आपल्या सूचनांचेही स्वागत आहे. जसजसे सुधारित प्रश्नसंच तयार होतील तसतसे ते अपलोड करीत जाऊ. आपण सर्व मिळून हे प्रश्नसंच अधिकाधिक चांगले करीत जाऊ आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय गाठू.

हे प्रश्नसंच वापरताना काही अडचण आल्यास पुढील इमेलवर संपर्क साधावा -questionbankmscert@gmail.com  फोन नं. 8275202366


नंदकुमार
प्रधान सचिव
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग.


हे प्रश्नसंच तयार करण्यात विद्यापरिषदेतील तज्ज्ञ व अधिकारी यांच्याबरोबर सहभागी व्यक्ती -

डाएटमधील प्राध्यापक –
डॉ. चंद्रकांत डी. साळुंखे

शासकीय शाळांमधील शिक्षक –
1) शशिकला एकनाथ पाटील
2) जितेंद्रसिंग कल्याणसिंग पाटील
3) अनिल डी. चाचर
4) सुधीर आर. जगताप
5) सचिन विश्वनाथ पाटील
6) ज्योती दीपक बेलवले
7) मंगल निवृत्ती पवार
8) विक्रम सोनबा अडसूळ
9) सरिता सदाशिव फडके
10) विकास देवके
11) बाळासाहेव नामदेव भोसले
12) सोमनाथ वामन वाळके

अनुदानित शाळांमधील शिक्षक –
1) निवृत्त - अलका साठे
2) रोहिणी रामदास मिठे
3) महेंद्र सोनजी नेमाडे

नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनमधील तज्ज्ञ –
1) डॉ. विवेक मॉंटेरो
2) गीता महाशब्दे
3) विपुला अभ्यंकर

No comments:

Post a Comment