जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

जि.प.शाळा दोऱ्याचापाडा

दोन महिन्यांपूर्वी जि.प.शाळा  दोऱ्याचापाडा शाळेत ग्रामपंचायतीच्या मार्फत पूर्ण केलेली ही संरक्षक भिंत...

  *Adoption of Art*

SVM Public School आसनगावच्या शाळेत नाताळच्या सुट्टीत गोंड चित्रशैली कार्यशाळा ATM जळगावचे सदस्य श्री. राकेश विसपूते सरांनी घेतली. मला चित्रकलेची आवड आहे म्हणून  मी देखील त्यात सहभागी होऊन त्यातील तंत्र शिकून  घेतले. याच ज्ञानाचा उपयोग करुन जि.प.शाळा दोऱ्याचापाडा येथे विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली...त्याची ही क्षणचित्रे....work in progress ...🙏

जि.प.शाळा दोऱ्याचापाडा येथे मुलांच्या सहाय्याने साकारलेली गोंड चित्रशैली.. यासाठी मंदा शिंदे मॕडमांचे सहकार्य लाभले...👆
















आजच्या ठाणे वैभव मध्ये  जागतिक महिला दिनानिमित्त  *सेवा-ज्ञानरुपी-'ज्योती'* हा आशा तेलंगे व रुपेश पवार यांच्या संकल्पनेतून
सौ.भाग्यश्री भरत काळे (औरंगाबाद) यांनी  राष्ट्रपती पुसरस्कार प्राप्त शिक्षिका सौ.ज्योती दीपक बेलवले यांच्या कार्यावरील लिहिलेला लेख










*आम्ही घेतो ज्ञानाचा वसा.*
*सांभाळतो सावित्रीमाईचा वारसा.*

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञानज्योती फातिमा शेख* यांना जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाड्यातर्फे विनम्र अभिवादन !!!

आज शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंचा जीवन परिचय उलघडून सांगितला. फातिमा शेख यांबद्दल माहिती सांगितली. शाळेत *बालिकादिन प्रतिज्ञा* घेण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षकांनी *माहिती, कविता , गीताद्वारे* अधिक माहिती दिली. लेक जगवा लेक शिकवा यावर आधारित घोषणा देऊन जागृती निर्माण केली. *अनुष्काने सावित्रीबाईंची वेशभूषा करुन आणि सुवर्णाने फातिमा शेख यांची वेशभूषा* करुन माहिती सांगितली.
मधल्या सुट्टीनंतर इ. ६ वी च्या विद्यार्थ्यांनी कलेचा आधुनिक प्रकार *डुडल* तयार करण्याचा प्रयत्न केला. वर्गातील सुवर्णाने *लेक शिकवा, लेक जगवा* यावर आधारित *डुडल* तयार केले.  जे विद्यार्थी वाचन लेखनात मागे आहेत त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी दत्तक घेतले आणि मार्गदर्शन केले. उत्साहपूर्ण वातावारणात बालिकादिन साजरा करण्यात आला.

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा
ता- शहापूर, जि- ठाणे.








*भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था ठाणे आणि शिक्षण विभाग पंचायत समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित   तालुकास्तरीय कब बुलबुल, स्काऊट गाईड उत्सव*

दि. - १४ जानेवारी २०२०
स्थळ - दमानिया स्कूल, शहापूर

*प्रमुख उपस्थिती*
*मा. श्री. दुसाणे साहेब - जिल्हा मार्गदर्शक*
*मा.श्रीम. शिंगे मॕडम - सभापती पं. स. शहापूर*
*मा. श्री. पष्टे सर - पंचायत समिती सदस्य*
*मा. श्री. हिराजी वेखंडे - ग.शि. पं. स. शहापूर*
*आ.विस्तारआधिकारी, केंद्रप्रमुख आणि सर्व विषयतज्ञ*

या उत्सवात *जि.प.शाळा दोऱ्याचापाडा मधील स्काऊट गाईड युनीट* सहभागी झाला होता. अनेक स्पर्धा आणि मनोरंजक, बौद्धिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. आमच्या शाळेस *हस्तकला विषयात प्रथम क्रमांक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक* मिळाले.

सदर कार्यक्रमासाठी ३२ शाळांची निवड करण्यात आली होती.  एकूण २५६ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. शहापूर तालुक्यात १६० युनिटची नोंदणी झाली आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोहर मडकेसरांनी केले.

या उत्सवातील सहभागामुळे माझ्या दोऱ्याचा पाड्याच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली.आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी  चित्तवेधक मनोऱ्यांचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. मध्यप्रदेशातील आदिवासी गोंड नृत्याचे सादरीकरण केले. टाकाऊतून उपयुक्त हस्तकलेत सहभाग घेतला. एकंदरीत सकारात्मक उर्जा निर्माण करणारा हा उत्सव...
हा उत्सव म्हणजे ..
*सुदृढ, सुजाण, नागरिक निर्माण करणारा..*
 *देशाभिमान जागृत करणारा..*
*शिस्तबद्ध, नियोजित उत्सव...*
 म्हणजे कब बुलबुल, स्काऊट गाईड उत्सव होय.

           सौ. ज्योती दिपक बेलवले.
          जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा,
          केंद्र - सापगाव ,ता- शहापूर,
                   जि- ठाणे.










 *परिचय नवीन नोटांचा*

वर्गात इतिहास शिकवताना ऐतिहासिक नाण्यांबाबत माहिती देत असताना मला असे लक्षात आले की वर्गातील मुलांनी चालू (आताच्या काळातील ) नवीन नाणी  पाहिलेली आहेत परंतु नवीन नोटांचा त्यांना  परिचय नाही. १ रुपया,  २० रुपये, २०० रु, २००० रु इ. नवीन नोटा त्यांनी पाहिलेल्याच नाहीत. म्हणून बॕक आॕफ इंडिया मुलुंड शाखेतील प्रमोद संखे यांच्या सहकार्याने चलनातील सर्व नवीन नोटांचा सेट प्राप्त करुन घेतला. मुलांना या नोटा हाताळायला दिल्या. आणि गणिती खेळ घेतले. प्रत्यक्ष खरोखरच्या नोटा पाहून मुलांना खूप आनंद झाला. २००० ची नोट,  १ रुपयाची नोट मुलांना खूप आवडली.

          सौ. ज्योती दिपक बेलवले.
          जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा
           ता- शहापूर, जि- ठाणे.






 आज *जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन* मोठ्या जल्लोशात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
 *प्रभातफेरीसोबतच संविधान दिंडी* काढून घोषणा देत वातावरणनिर्मीती आणि जागृती करण्यात आली. *आकर्षक रांगोळी आणि फलकलेखनाद्वारे* उत्साही वातावरणात भर टाकण्यात आली. सामुदायिकरितीने *संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन* केले गेले. मा. सरपंच मॕडमांनी ध्वजारोहण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कासार मॕडम यांनी प्रास्तविक केले. विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी विविध विषयांवर विचार व्यक्त केले.
*अनेकता में एकता...*
*हिंद की विशेषता !*
या उक्तीप्रमाणे अनेक रंगांनी नटलेले, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी *योगासने, टिपरी नृत्य प्रकार, आदिवासी नृत्य, मनोरे, देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर गीतांवर रेकाॕर्ड डान्स , आनंददायी गीते* इ. प्रकारचे  कार्यक्रम सादर केले. यासाठी शिंदे मॕडम, डोंगरे मॕडम, पवार मॕडम यांनी मोलाचे सहकार्य केले.  सर्व शिक्षक , विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. कार्यक्रम पाहिल्यानंतर ग्रामस्थांना खूप आनंद झाला त्यांनी समाधान व्यक्त करुन शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पवार मॕडमांनी केले.

         सौ. ज्योती दिपक बेलवले.
        जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा
        ता- शहापूर, जि- ठाणे.













:*आमची बहुगुणी परसबाग*


 केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने  दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार देशभरातील सर्व शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या जागेमध्ये परसबाग उभारणे अनिवार्य केले आहे . ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.हिरालाल सोनावणे आणि शिक्षणाधिकारी मा. संगिता भागवत मॕडम यांच्या प्रेरणेने शालेय परिसरात परसबाग उभारण्याचे ठरवले.

परसबाग म्हणजे अंगणात किंवा  परसात केलेली भाजीपाल्याची बाग होय. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय परिसरात परसबाग तयार करता येते तर शहरी भागात जागेची अडचण असल्याने गच्चीवरील परसबाग किंवा कुंडीतील परसबाग तयार करता येते. कुंडी म्हणून प्लास्टिकच्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, तेलाचे कॕन, बादल्या, रंगाचे डबे इ. चा वापर करता येतो.

जि.प.प्राथ.शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता- शहापूर ही शाळा १००% आदिवासी विद्यार्थी असलेली शाळा. शाळेतील विद्यार्थ्यांच्या  पोषण आहारात ताज्या भाज्यांचा वापर व्हावा, ताज्या भाजीपाल्याच्या उपलब्धतेने  बालकांमधील  कुपोषण  व जीवनसत्वाची कमतरता हटविणे, शालेय वयोगटात बागकाम  प्रात्यक्षिक व निसर्गपूरक जीवनशैलीची आवड जोपासणे , शालेय वयोगटात पोषणमूल्य असलेल्या  नैसर्गिक आहारीय पदार्थांची ओळख होणे या हेतुने परसबागेची निर्मिती केली.
यासाठी मा.गटशिक्षणाधिकारी वेखंडे साहेब, मा.विस्तारआधिकारी शिर्के साहेब, मा.केंद्रप्रमुख मडके सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कासार मॕडम, पवार मॕडम, डोंगरे मॕडम, शिंदे मॕडम, सर्व विद्यार्थी आणि पोषण आहार शिजवणाऱ्या ताई इ. नी सहकार्य केले.

शालेय परिसरातील गवत काढून जमीन भुसभुशीत करुन वाफे तयार केले. गादी वाफ्यात मेथी,माठ, शेपू, पालक, मुळा, कोथिंबीर इ, पालेभाज्यांची लागवड केली.
होते.  पालेभाज्यांची लागवड करताना बियाणे किंवा देठाची लागवड केली तरी चालते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचवीस दिवसांत त्यास नवीन अंकूर येतो व आपल्याला भाजी मिळते.

सरी वाफेत वांगी, मिरची, टोमॅटो , गवार, भेंडी,कढीपत्ता, दुधी, डांगर, कारले, अळू इ. फळभाज्या लावल्या .तसेच शेवगा या झाडाचे संगोपन करतो आहोत.

शालेय परिसरात वर्तुळ , त्रिकोण , आयत, चौरस असे भौमितिक आकारात विटा लावून त्यात आॕक्सिजन झोन, औषधी वनस्पती ( कोरफड, तुळस, गवतीचहा, हळद, आले, मेंदी, अडूळसा, हाडमोडी इ.) ची लागवड केली.

शाळेच्या समोरच्या भागात शोभिवंत झाडे, फुलझाडे ( गुलाब, मोगरा, टगर, जास्वंद, झेंडू इ.) केळी, जांभूळ, पेरु, आवळा इ. रोपांची लागवड केली.
फुलझाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची व मोकळ्या हवेची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना समोर अंगणात लावले पुरेसा सूर्यप्रकाश नसेल तर झाडांची चांगली वाढ होत नाही.

परसबागेतील भाज्यांचा वापर शालेय पोषण आहारात नियमितपणे केला जातो.  पं. स. शहापूर तर्फे बियाणे देण्यात आले आहे. परिसरातील पालापाचोळा कुजवून कंपोष्ट खत तयार केले. परसबागेला नियमित पाणी दिले जाते त्याची निगा राखली जाते. यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक मेहनत घेतात. पावसाळी हंगामात भाजीपाला पिकांना पाण्याची गरज भासत नाही. परंतु आठ दिवसांमध्ये जास्त दिवस पाऊस पडला नाही तर पाण्याची सोय करावी लागते. तसेच अतिउपसा झाल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी लागते.

परसबागेतील ताज्या भाज्यांच्या वापरामुळे शालेय पोषण आहार आधिक रुचकर बनू लागला. मुले स्वतः भाजी पिकवत असल्याने स्वनिर्मितीचा वेगळा आनंद मिळून शालेय उपस्थितीत वाढ झाली आहे. वाफे कसे तयार करावेत, भाज्यांची लागवड कशी करावी, त्यांची काळजी कशी घ्यावी हे विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून शिकले. न आवडणाऱ्या भाज्या मुले खावू लागली. विविध भाज्यांमुळे आहार रूचकर होऊ लागला आहे . स्वावलंबनाचे धडे मुलांना सहज देता आले. कमी वेळात, कमी खर्चात सकस आणि संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने भाज्यांचं उत्पादन आरोग्यासाठी खूप उपयोगी पडते. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट झाली. परसबागेमुळे स्वच्छ आणि सुंदर वातावरण निर्मिती झाली. पक्षांसाठी पाणवठा म्हणजेच झाडावर पाणी पिण्यासाठी सुविधा केली. त्यामुळे दोऱ्याचापाडा ही शाळा मुलाफुलापाखरांची शाळा झाली आहे. अशा प्रकारे सर्वांच्या श्रमदानातून निर्माण झालेली आमची बहुगुणी परसबाग. सर्वांना हवीहवीशी वाटणारी, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारी आमची परसबाग तयार झाली आहे...

परसबागेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दुवा वापरा..
https://youtu.be/x4dn9FS8gfs

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता- शहापूर,
    जि- ठाणे.










 काल दि.११ फेब्रुवारी २०२० रोजी NKT सभागृह, ठाणे येथे जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न झाल्या. सर्वच स्पर्धा चुरसीच्या झाल्या. परिक्षकांचा कस लागावा अशा स्पर्धा. जिल्हा परिषद शाळेतील सहभागी सर्वच विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप कौतुक..या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करण्याची संधी मला आणि श्री. गणेश गायकवाड, भिवंडी यांना मिळाली. एक उर्जस्वल कार्यक्रम.



*मराठी भाषा गौरव दिन*

https://youtu.be/xO0kDp2SgRY

*ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची...*

*महावंदनीय, अति प्राणप्रिय, ही माय मराठी अमुची....*

जि.प.प्राथ शाळा दोऱ्याचापाडा येथे मराठी राजभाषा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. आज मराठी गौरव दिनानिमीत्त *इ. ६ वी च्या वर्गाने बालसभेचे* आयोजन केले. संपूर्ण कार्यक्रमाची धुरा विद्यार्थ्यांनी सांभाळली.

मराठी भाषा गौरव दिनासाठी सुरेख रांगोळी काढून आणि घोषवाक्ये लिहून वातावरण निर्मिती केली. या कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थान कु. अनुष्का इ. ६ वी* यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात *मराठी ग्रंथ पुजन* ( मराठी साहित्य पुजन ) नाने झाली. यानंतर *मराठी दिनाची प्रतिज्ञा* घेतली. *माय मराठी* या कवितेचे सामुहीक गायन घेतले.

२७ फेब्रुवारी हा *कुसुमाग्रजांचा जन्मदिवस* आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. विद्यार्थ्यांनी *कुसुमाग्रजांचा जीवनपट* सांगितला .जीवनपट टप्प्याटप्पाने सांगून त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, साहित्य यावर प्रकाश टाकला. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान सांगितले.

कुसुमाग्रजांची *कणा* या प्रेरक कवितेचे वाचन सुरजने केले. *मराठीतील विविध कविता, परिच्छेद,,विनोद, नाट्यछटा, संवाद, अभंग,* इ.साहित्य प्रकारांचे अभिवाचन केले.

*मराठी बोलीभाषेतील जिकान ( शब्दकोडे)* यात शाळेतील मुलांनी विक्रमी संख्येने सहभाग घेऊन आम्हा शिक्षकांच्या शब्दसंपत्तीत देखील भर टाकली.अनेक नवीन शब्द माहित झाले.

*माझी मातृभाषा मराठी* या विषयावर सहावीतील प्रमोदने आपले विचार मांडले.
*मराठी भाषेचे निर्मिती* आणि ती जपण्यासाठी काय करावे यावर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी मराठी गौरव दिनावर आधारित *विविध घोषणा दिल्या*. मराठी गौरव दिनाचा आॕडीओ ऐकवला.
अध्यक्ष कु. अनुष्काने आपल्या अध्यक्षीय भाषणात *मराठीचे महत्त्व आणि म्हणींचे काव्य* सादर केले.

*आन, बान, शान...*
*मराठी असे आमुचा पंचप्राण*

सुरजने उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

बालसभेमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
*माझ्या मराठीचा जागर जागर*
*भरु ज्ञानाची घागर घागर*
मुलांनी मराठी भाषेचा जागर करुन प्रेरणा निर्माण केली.

बालसभेचा संक्षिप्त  video पाहण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.
https://youtu.be/xO0kDp2SgRY

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता- शहापूर,
       जि- ठाणे.









*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमीत्त विज्ञान जत्रा आणि पर्ण प्रदर्शन*

२८ नोव्हेंबर २०२० रोजी जि.प.प्रा. शाळा  दोऱ्याचापाडा येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून *विज्ञान जत्रा आणि पर्ण प्रदर्शन* आयोजित करण्यात आले. विज्ञान जत्रेत विद्यार्थ्यांनी अनेक *छोटे प्रयोग* करुन दाखवले. वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी मार्गदर्शन केले.

शाळेत *पर्ण प्रदर्शन* ( विविध पानांचे प्रदर्शन ) आयोजित केले. यामध्ये जवळपास १०० विविध प्रकारच्या *झाडांच्या पानांचे नमुने* विद्यार्थ्यांनी जमा केले. *पानाचे नाव, उपयोग आणि पानापानातील विविधतेचा अभ्यास* यातून झाला.

सध्याचा उन्हाळा तिव्र आहे. यासाठी शालेय परिसरातील झाडांना बाटलीच्या साह्याने *ठिबक सिंचन* उपक्रम राबवला. बाटलीवर विद्यार्थ्यांचे नाव लिहून त्या विद्यार्थ्यांला एक ठराविक झाड दत्तक दिले. *दत्तक झाड* उपक्रमाची सुरुवात केली. त्या झाडाची जबाबदारी त्या मुलावर सोपवण्यात आली.

बरेच दिवस बंद असलेला शाळेतील प्रोजेक्टर आज सुरु झाला. यासाठी *राजू बेलवले* यांनी सहकार्य करुन प्रोजेक्टर सुरु करुन दिला. *प्रोजेक्टरवर फिल्म दाखवून  मुलांना डाॕ.सी. व्ही. रामन* यांच्या विषयी अधीक माहिती दिली.
विविध *वैज्ञानिक कोडी* सांगण्यात आली.
जसे.

*मी वनस्पतीला आधार देतो.*
*माती घट्ट धरुन ठेवतो.*
*जमिनीतील पाण्याचे व पोषकतत्वाचे शोषण व वहन करतो.*
*सांगा बरं मी कोण?*
                            *उत्तर - मूळ*

*वैज्ञानिक जाणीवेवर आधारित गीतगायन* करुन विज्ञान दिन साजरा केला.

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता- शहापूर,
         जि- ठाणे.














*रानफुले आणि पानांच्या रांगोळ्या*

आज *जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा* येथील माझ्या वर्गातील मुलांनी  काढलेल्या रांगोळ्या. पावसाळ्यात रानात येणारे *गवतफुले व पानांचा* वापर करुन त्यांच्या कल्पकतेने काढलेल्या रांगोळ्या. विशेष म्हणजे *हत्तीची पानांची  रांगोळी काढून त्याच्या अवयवांना इंग्रजीतून खडूने नावे लिहलीत*.. मधल्या सुट्टीत मुलांनी या रांगोळ्या काढल्या आहेत..

सौ.ज्योती दिपक बेलवले 
जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, 
केंद्र - सापगाव, ता - शहापूर, 
जि - ठाणे






*शालोपयोगी साहित्य निर्मिती*
*विषय - इंग्रजी आणि कार्यानुभव*
*साहित्य - जुनी पुस्तके, फेव्हिकाॕल, कात्री, दोरा, स्केचपेन इ.*
माझ्याकडे इंग्रजी विषयावर आधारित जुनी पुस्तके होती.  त्या पुस्तकातील रंगीत चित्रांचा उपयोग करुन माझ्या वर्गातील मुलांनी  *वर्गसजावटीसाठी बोलक्या पताका आणि तरंगचित्रे* तयार केली. यासाठी मुलांचे गट करुन पताक्यांचा आकार कसा कापावा याबाबत मार्गदर्शन करुन प्रत्येक गटाला कागद वाटून दिले. गणपतीच्या सुट्टीत पताका कापून त्याला बाॕर्डर घरुन करण्यास सांगितले . बोलक्या पताकांवर लिहण्याचे मुद्दे विषयनिहाय मुलांना घरुनच लिहून आणण्यास सांगितले .त्यामुळे सर्व विषयांवर आधारित पताका तयार झाल्या. 

 तरंगचित्रांबाबत साहित्य कसे तयार करावे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन वर्गात केले .अशाप्रकारे मुलांच्या मदतीने बोलक्या पताका आणि तरंगचित्रे तयार केली. त्यातील नमुना म्हणून काही तरंगचित्रांचे नमुने.

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा दोऱ्याचापाडा.
केंद्र - सापगांव, ता- शहापूर 
           जि - ठाणे





🤝✊🍅🥕🌶🥦🌹🌸🌳🌲🎄🌵🌴

*आम्ही पाच आमचे शेकडो हात*

जि.प.शाळा दोऱ्याचापाडा येथे गेल्या काही दिवसांपासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून परसबागेची निर्मिती केली. यासाठी प्रथम शाळेच्या  आवाराची स्वच्छता करण्यात आली. गवत काढून माती भुसभुशीत केली. विटांच्या आकाराने *विविध भौमितिक आकार* तयार करुन त्यात वेगवेगळ्या प्रकारचा *भाजीपाला जसे टोमॅटो, मिरची, अळू, कढीपत्ता, कारले, भेंडी, वांगे इ. भाज्यांची* लागवड केली. भौमितिक आकारांमध्ये *आॕक्सिजन झोन* आणि *औषधी वनस्पतींची जसे कोरफड, तुळस, मेंहदी, हाडमोडी,हळद, गवतीचहा,ओवा इ.* ची लागवड केली.
स्वच्छता पंधरवडाच्या निमित्ताने परसबागेतील आणि शालेय परिसरातील गवत काढून *हात धुण्याचे प्रात्यक्षिक* घेतले. गावात *स्वच्छताफेरी* काढण्यात आली. वैयक्तिक स्वच्छतेवर आणि सामाजिक *स्वच्छतेवर आधारित गीतगायन* घेतले.
परसबागेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कासार मॕडम, पवार मॕडम, डोंगरे मॕडम, शिंदे मॕडम, मी आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.आता परसबाग छान फुलतेय..बहरतेय
अशी *आम्हा पाच जणींच्या आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या हाताने केलेल्या श्रमातून तयार झालेली ही परसबाग.*

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा. दोऱ्याचापाडा
ता- शहापूर , जि- ठाणे.

🤝✊🍅🥕🌶🥦🌹🌸🌳🌲🎄🌵🌴






*वाचू आनंदे , मोबाईल संगे*

https://youtu.be/X5YDtwuVTN0

वाचन कौशल्य विकसित होण्यासाठी आणि वाचनाची अभिरुची निर्माण होण्यासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारे, गोष्टींची पुस्तके, किशोर सारखी मासिके, वर्तमानपत्र इ. वाचन साहित्य वाचण्याची सवय मुलांना लावली व तशी संधी निर्माण करुन साहित्य उपलब्ध करुन दिले. बदल हा सर्वांनाच आवडतो. त्यातही हा बदल तंत्रज्ञानाशी संबंधित असेल तर....
कारण जि.प.शाळा दोऱ्याचापाड्यात शिक्षण घेणारे सर्वच विद्यार्थी आदिवासी समाजाचे. मोबाईलवर देखील अभ्यास करता येतो हे दिक्षा अॕप, सोलर सिस्टीम , अॕनिमल सफारी मॕजिक क्यूब, 4d अॕनिमल इ. अॕपचा वापर अध्यापनात केल्याने त्यांना आता कुठे समजतय. आनंददायी वाचनासाठी मी मोबाईलचा  आणि ब्ल्यू टूथ स्पिकरचा वापर केला. त्याचा परिणामकारक बदल विद्यार्थ्यांमध्ये होतोय.. मुले नवनवीन इंग्रजी , हिंदी , मराठी च्या चित्र - वाक्यरुप गोष्टी मोबाईलवर वाचू लागली. बाईंचा मोबाईलवर गोष्टी वाचण्याचा आनंद मुले घेऊ लागली. नवीन गोष्टीचे वाचन करतात. इंग्रजी, हिंदी आणि मराठी गोष्ट वाचनाचा नमुना म्हणून हा व्हिडिओ ..
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दुवा वापरा..

https://youtu.be/X5YDtwuVTN0

सौ. ज्योती दीपक बेलवले.
जि.प.शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता- शहापूर 
जि - ठाणे







*अशी देखील मतदान जागृती*
*सुवर्णपर्णाद्वारे मतदान जागृती*

परवाच दसरा सण होऊन गेला. त्यानंतर इलेक्शनचे ट्रेनिंग असल्यामुळे आज शाळेत गेले. मुलांनी शिदाची पाने (आपट्याची पाने) सोने म्हणून  वाटली. मुलांना *वृक्ष संवर्धनाचे महत्त्व* पटवून दिले.परंतु  या जमलेल्या पानांचे काय करता येईल असे विचारचक्र सुरू झाले. या पानांचा उपयोग करुन *मतदान जागृतीसाठी सुवर्णपर्ण*  उपक्रम घेतला. जमलेली सर्व पाने मुलांना वाटली. मतदान जागृतीसाठी चर्चेद्वारे माहिती दिली आणि गावात जाणीवजागृती करण्याचा विचार मांडला. विद्यार्थ्यांना हा विचार आवडला. म्हणून  त्या पानावर *मतदान जागृतीवर आधारित घोषवाक्ये, चित्र* काढून ते स्केचपेनने लिहण्यास सांगितले. तयार झालेले मतदान जागृती सुवर्णपर्ण घरी *पालकांना आणि गावकर्यांना* वाटण्यास सांगून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले.

राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे अन् ते आपण बजावलेच पाहिजे या विचाराचा प्रसार व प्रचार करण्यासाठी मतदान जागृती सुवर्णपर्ण उपक्रम घेतला.

सौ.ज्योती दीपक बेलवले.
जि.प.शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता- शहापूर 
जि - ठाणे






*जि.प.शाळा दोऱ्याचापाडा,*
 *ता - शहापूर, जि - ठाणे.*
*रांगोळी स्पर्धा ...तंबाखू मुक्ती , स्वच्छ भारत, कलात्मकतेवर आधारित मुक्त रांगोळ्यांचे काही नमुने .* 
*सहभाग- इ.१ ली ते ७ वी चे विद्यार्थी*






📖📖📖📖📖📖📖📖
*वाचन प्रेरणा दिन*
*डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जन्मदिवस* 
*जागतिक हात धुवा दिन*
📖📖📖📖📖📖📖📖

"ग्रंथ आमुचें साथी,
ग्रंथ आमुच्या हाती ll
ग्रंथ उजळती  अज्ञानाच्या,
अंधाराच्या राती ll
या ग्रंथांच्या तेजामधुनी ,
जन्मा येते क्रांती,
ग्रंथ शिकवती ,माणुसकी 
अन ग्रंथ शिकवती शांती  ll"
📖📖📖📖📖📖📖📖

आज *जि.प.शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र सापगाव, ता- शहापूर , जि- ठाणे येथे उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.* या दिनानिमित्त मुलांनी शाळा भरण्याआधीच *वाचनाचे महत्त्व सांगणारी पांढऱ्या दगडांची रांगोळी* काढली होती. गावातून *ग्रंथदिंडी* काढून वातावरणनिर्मिती करण्यात आली. 

पवार मॕडम यांनी  *जागतिक हात धुवा दिनानिमित्त दहा कृतीद्वारे हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक*
 दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून करवून घेतले.वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले.

डोंगरे मॕडम आणि विद्यार्थ्यांनी *वाचनाचे महत्त्व सांगितले . शाळेच्या मुख्याध्यापिका कासार मॕडम यांनी आपल्या भाषणात *डाॕ कलामांचा जीवनपट* उलगडला. शिंदे मॕडम यांनी *कलामांच्या जीवनातील प्रसंग गोष्टींरुप* सांगितले. मी *वाचन प्रेरणा दिनावर आधारित गीताचे गायन* घेऊन *उडाण हा चित्रपट* दाखवला. *इ. ६ वी तील मराठीच्या पुस्तकातील पाठावर आधारित डाॕ. कलामांच्या बालपणापासूनची माहिती*  सांगितली. *कलामांचे प्रेरणादायी विचार* सांगितले.

*इ. ६ वी तील प्रमोद ठोंबरे* या विद्यार्थ्याने *मी पुस्तक* अशी *वेशभूषा* करुन *पुस्तकाचे महत्त्व, पुस्तकाची काळजी* कशी घ्यावी इ. द्वारे पुस्तकाचे *आत्मकथनाद्वारे* स्पष्ट केले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी *काव्यवाचन, विनोद, एकपात्री, संवादवाचन इ.* साहित्य प्रकारांचे अभिवाचन घेतले.

 वाचनध्यासासाठी  विद्यार्थ्यांनी  आणि शिक्षकांनी पुस्तकांचे वाचन केले. वाचन हे वाचन प्रेरणा दिनानिमित्त मर्यादित न रहाता ते दररोज करावे यासाठी *फिरती वाचनपेढी ( Mobile reading bank )* ची निर्मिती करण्यात आली. *वाचाल तरच वाचाल* याचे महत्त्व जाणून घेऊन, डाॕ. कलामांचे प्रेरणादायी विचारांची दिशा घेऊन, अडचणींवर मात करुन उचित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करुन जीवनाचे सोने करता येते ही शिकवण घेतली.

सौ.ज्योती दीपक बेलवले.
जि.प.शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता- शहापूर 
जि - ठाणे.
📖📖📖📖📖📖📖📖





https://youtu.be/Os0IHc5N5qg

काही दिवसांपूर्वी *जि.प.शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता- शहापूर,जि - ठाणे* येथे चेहरा रंगवणे ( face painting )  हा कलेवर आधारित उपक्रम घेतला. त्यावेळी माझ्या वर्गातील *प्रतिभा सुकऱ्या मुकणे* या विद्यार्थीनीने सादर केलेली गोष्ट.



*विषय - कार्यानुभव + कला + इतिहास* 
*इयत्ता - ६ वी*
*घटक - हडप्पा संस्कृती* 
*उपघटक - मुद्रा तयार करणे.*
*साहित्य - माती, पुठ्ठा, दगड, पाणी इ.*

आज शाळेचा शेवटचा दिवस. उद्यापासून दिवाळीची सुट्टी . दुपार सत्रानंतर मुलांना मातकाम कसे करावे, कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. *इ. ६ वी तील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील हडप्पाकालिन मुद्रा, दागिने* बनवण्यास सांगितले. मुलांना मातीत खेळायला आवडते. त्यांनी पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा तयार करून त्या *मुद्रांचा उपयोग* सांगितला.

सौ.ज्योती दीपक बेलवले.
जि.प.शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता- शहापूर 
जि - ठाणे




*आमची शब्दबाग*

*वाचन कौशल्य  विकसित करणारे शब्दांचे झाड.*
*झाड झाड मिळून झाली शब्दांची बाग.*
जि.प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता - शहापूर, जि - ठाणे येथील
*प्रगतशिल विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी* यासाठी वातावरणनिर्मीतीसाठी *शालेय परिसरातील झाडे आणि चित्र - शब्द कार्ड, शब्दकार्ड, वाक्यकार्ड* यांचा वापर केला. *दत्तक मित्र* या उपक्रमाद्वारे *विद्यार्थी - विद्यार्थी आंतरक्रियेद्वारे* सुट्टीत वाचन घेतले जाते. झाडांना सर्व प्रकारचे कार्ड लावण्यासाठी इ. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेतले. मोठ्या वर्गातील विद्यार्थी छोट्या  वर्गातील मुलांचे वाचन घेतात. वाचन करण्यासाठी हा वेगळा अनुभव असल्याने विद्यार्थी आनंदाने यात सहभागी होतात आणि शालेय परिसर देखील सुंदर दिसतो.

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा, 
केंद्र - सापगाव, ता - शहापूर, 
जि - ठाणे




इयत्ता - ६ वी
विषय - सा. विज्ञान 
घटक - आपली अस्थिसंस्था

आपली अस्थिसंस्था स्पष्ट करताना  तंत्रज्ञानाचा वापर केला. याद्वारे हाडांचे प्रकारांचे  ( चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे आणि लांब हाडे) निरीक्षण करुन चर्चेद्वारे स्पष्ट केले. अस्थिसंस्थेचे माॕडेल दाखवले. 
परिसरातील प्रत्यक्ष हाडांचे नमुने गोळा करुन त्याचे निरीक्षण करुन हाडांचे प्रकार ओळखण्यास सांगितले. आपल्या शरीरात या प्रकारची हाडे कुठल्या भागात आहेत यावर तर्क करण्यास सांगितले.
जमवलेल्या हाडांचे नमुने वर्गात संग्रही करुन ठेवले.

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता - शहापूर, जि - ठाणे




*माझी शाळा - माझा किल्ला*

जि.प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता - शहापूर, जि - ठाणे येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम करताना पाया खणताना  मोठे दगड  निघाले. त्या दगडांचा, मातीचा आणि खडूचा वापर करुन किल्ला तयार केला . त्या किल्ल्यावर तुरूंग , तळे, तोफा, छुपा रस्ता, बुरुज, झाडे इ. बाबी दाखवल्या आहेत. किल्ला सुकल्यावर ओल्या खडूने पांढरे पट्टे ओढले. शाळेतील मुलांनी मोकळ्या वेळेत हा किल्ला तयार केला आणि नवनिर्मितीचा आनंद घेतला.

सौ. ज्योती दिपक बेलवले .
जि.प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता - शहापूर, जि - ठाणे




💧💦💧💦💧💦💧💦💧💦
*सापगाव केंद्रातील शिक्षकवृंदांच्या, विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारलेल्या वनराई बंधाऱ्याचे मा. शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते जलपुजन आणि पाहणी*
💧💦💧💦💧💦💧💦💧💦

*प्रमुख उपस्थिती*

 *मा. शिक्षणाधिकारी संगीता भागवत मॕडम- जि. प. ठाणे*
*मा. उपशिक्षणाधिकारी राऊत मॕडम,*
   *मा सौ दिपाली पाटील मँडम जिल्हा परिषद च्या अध्यक्षा मा छायादेवी शिसोदे मँडम प्रकल्प संचालक  पाणी पुरवठा मा सौ वंदना ताई भांडे मँडम मा अनिलजी निचिते साहेब मा श्री किशोरजी शेलवले*
  *सभापती मा.सोनल शिंगे मॕडम- शहापूर पंचायत समिती,* *गटशिक्षणाधिकारी मा. श्री. हिराजी वेखंडे साहेब,*
*, ग्रामपंचायत हिव  उपसरपंच धामणे सर, ग्रामसेवक मडके भाऊसाहेब*

      जिल्हा परिषद ठाणे  यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या *केंद्र- सापगाव अंतर्गत सपाटपाडा गावाच्या निसर्गरम्य परिसरात दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी जागतिक माती दिनानिमीत्त सापगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा. अरुण मडके सर* यांच्या मार्गदर्शनाखाली सापगाव केंद्रातील *जि प शाळा दोऱ्याचापाडा आणि जि.प. शाळा अंदाड  येथील विद्यार्थ्यांनी* तसेच सापगाव केंद्रातील शिक्षक वृंद, ग्रामपंचायत हिव येथील उपसरपंच, ग्रामसेवक  यांच्या श्रमदानातून  उभारलेल्या *वनराई बंधाऱ्याचे  जलपुजन व वनराई बंधारा* पाहणी दौरा आज मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
               मान्यवरांनी वनराई बंधाऱ्याची पाहणी केली असता अडवलेला पाणीसाठा पाहून  आश्चर्य व्यक्त केले. वनराई बंधारा बांधण्याचा उद्देश, त्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले. 
आज सकाळ पासून श्रमदान सुरु होते. *पाणी आडवा, पाणी जिरवा* हे ब्रीदवाक्य आज सर्वचजण अनुभवत होते. *दिवसभर श्रमदान करुन थकलेल्या जीवांना संजीवनी देण्याचे काम आ. शिक्षणाधिकारी भागवत मॕडम आणि गटशिक्षणाधिकारी वेखंडे साहेबांनी केले.*
यावेळी सर्व श्रमदात्यांना जेवणाची सोय करण्यात आली होती. श्रमदानाचा आणि  वनभोजनाचा संयुक्त उपक्रम यानिमित्ताने साजरा करण्यात आला. आलेल्या अधिकाऱ्यांनी देखील श्रमदान आणि वनभोजनाचा आनंद घेतला. सर्वांच्या सहकार्याने सुरुवातीला अशक्य वाटणारे कार्य सहजपणे शक्य झाले. 

*आजचा दिवस (श्रमदान) म्हणजे ....*
*सकारात्मक उर्जेचा..*
*समाजऋण फेडण्याचा..*
*सहकार्याचा...*
*एकीचा...*
*श्रमप्रतिष्ठेचा...*
*स्त्री - पुरुष समानतेचा..*
*वैज्ञानिक जाणिवेचा..*
*कौतुकाचा..*
*अशक्य ते शक्य करण्याचा..*
*जलसाक्षरतेचा...*

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प. शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता - शहापूर 
जि.- ठाणे.



*पाड्यावरील शाळेची मुले देखील झाले..सोनेरी  (वैज्ञानिक ) क्षणांचे सोबती - विज्ञान कार्यशाळा*

*डोळे उघडून बघा मुलांनो झापड लावू नका.*

 *जि.प.शाळा दोऱ्याचापाडा येथील इ. ६ वी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण होण्यासाठी माध्यमिक विद्यालय अंदाड  मधील विज्ञान कार्यशाळेत सहभाग आणि प्रयोगशाळेस भेट दिली.* विद्यालयातील *देव सरांनी* विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवून प्रयोग स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना साहित्य हाताळण्यास दिले. अनेक वैज्ञानिक संबोध, संकल्पना स्पष्ट झाल्या.

दुपारी सव्वा बारा वाजता *प्रा.डाॕ. भगवान चक्रदेव सर - ज्येष्ठ वैज्ञानिक*  यांनी *विज्ञान कार्यशाळेस* सुरुवात केली. ओघवत्या शैलीत, मुलांना सहज समजेल अशा भाषेत त्यांनी विज्ञानातील प्रात्यक्षिके करुन दाखवली. *मुलांना जादू आवडते परंतु जादू, चमत्कार काही नसते त्यामागे विज्ञान असते हे त्यांनी जादूच्या प्रयोगानेच सिद्ध करुन दाखवले. हवेच्या दाबामुळे तसेच वेगामुळे तरंगणारे चेंडूचे वेगवेगळे प्रकार, गुरुत्वाकर्षण, संवेगाच्या अक्षयतेचा नियम, गतीज ऊर्जा, जडत्व, चुंबकाचे प्रयोग, प्रकाशाचे वक्रीकरण, चुंबकीय प्रवर्तन इ. वैज्ञानिक संकल्पना* प्रयोगाद्वारे स्पष्ट केले. प्रयोग करताना *निरीक्षणशक्ती आणि कार्यकारणभाव* विद्यार्थ्यांना प्रश्न विचारुन जागृत ठेवले. प्रयोगात विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. संध्याकाळी साडेचार वाजता कार्यशाळेची सांगता झाली. *जादूमय प्रयोगातून स्पष्टीकरण असल्यामूळे विद्यार्थी उत्साहाने, चौकसपणे, कुतुहलाने सहभागी झाले.* या कार्यशाळेस विद्यार्थीचा प्रतिसाद खूपच छान होता. ते मनमोकळेपणे आपल्या शब्दात चर्चेत सहभागी झाले. माध्यमिक विद्यालय अंदाडच्या *मुख्याध्यापिका विशे मॕडमांचे विशेष आभार.* विद्यालयातील  सर्व शिक्षक हरड मॕडम, वीर मॕडम, मोरे सर आणि कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी होता आले. माझ्या पाड्यावरील मुले देखील झाले या सोनेरी (वैज्ञानिक ) क्षणांचे सोबती.

सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र - सापगाव, ता - शहापूर 
जि- ठाणे.





Late post
*अनपेक्षित भेट..*
मी आसनगावाच्या शाळेत नोकरीला असताना सुरज परदेशी नावाचा एक चुणचुणीत विद्यार्थी माझ्या वर्गात होता. विशेष म्हणजे त्याच्या दोन्ही बहिणीदेखील माझ्याच विद्यार्थीनी होत्या. सुरज चे आईवडील सुसंस्कारी आहेत. आज सुरज उत्तम प्रकारची नोकरी करतोय. त्याच लग्न झालय. एक छोटी मुलगी आहे त्याला. 

नेहमीप्रमाणे मी दोऱ्याचापाडा शाळेत निघाली. परंतु शाळेत जाताना हिव गावाच्या पुढे भातसा नदी लागते. त्यावर एक पूल आहे. पाऊस खूप जास्त झाला तर नदीचे पाणी पुलावरुन वाहते. रात्रभर मुसळधार पावसामुळे आज पुलावरुन पाणी वाहत होतं. माझ्यासोबत शाळेतील कासार मॕडम, डोंगरे मॕडम व शिंदे मॕडम होत्या. आम्ही जवळजवळ वीस मिनिटे पुलाच्या कडेलाच थांबून राहिलो. पुलावरचे पाणी कमी झाल्यावर आम्ही शाळेत गेलो. 

शालेय स्वच्छता झाली आणि एवढ्या मुसळधार पावसात एक चारचाकी गाडी शाळेच्या मैदानात उभी राहिली. मला आश्चर्य वाटले...एवढया पावसात कोण बरं आलं असेल? एवढ्यात गाडीतून दोन पुरुष, तीन स्त्रिया व एक लहान मुलगी ( जेमतेम दिड ते दोन वर्षाची) उतरली. मी त्यांना शाळेत यायला सांगितले. कासार मॕडमांनी शाळेत येण्याचे प्रयोजन विचारले.मला चेहरा परिचित वाटत होता. तितक्यात त्यातील एक स्त्री म्हणाली," मॕडम, आप यहाँ कैसे?" ही स्त्री म्हणजे सुरजची आई होती. मी म्हणाले," मेरी ट्रान्सफर हुई है ।" थोड्या गप्पा मारल्या. खुशाली जाणून घेतली. त्या म्हणाल्या आज सुरजचा वाढदिवस आहे. म्हणून गरजू मुलांना वह्या आणि  पेन वाटण्यासाठी आम्ही आलोत. सुरजचे वडील म्हणाले वह्या देताना आमचे फोटो घेऊ नका. आम्ही हे नावासाठी करत नाही. परंतु माझ्यासाठी हा विशेष क्षण होता. माझा माजी विद्यार्थी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करतोय..कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता. आपल्या  विद्यार्थ्यांतील हाच वर्तनबदल आपल्याला शिक्षक म्हणून अपेक्षित असतो. माझ्यासोबत माझ्या समाजातील लोक देखील शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना त्यांना मदत करणे याची जाणीव व त्यादृष्टीने सुरजने उचललेले पाऊल कौतुकास्पद होते. 

सुरजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरजचे वडील, आई, पत्नी, बहिण, मुलगी इ. शाळेत आले व त्यांनी शालोपयोगी साहित्याचे वाटप केले. अनपेक्षितपणे घडलेला हा प्रसंग व यातून आपल्या कामाची मिळालेली पोचपावती.
feeling proud dear Suraj beta.

सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचा पाडा
केंद्र-सापगाव, ता- शहापूर 
जि- ठाणे.




*शाळा गावात आणि गाव शाळेत येण्यासाठी घेतलेला उपक्रम* 

*चला करुया आवणी ( भाताची लावणी )*

https://youtu.be/GeAGF0pPiIA

दोऱ्याचापाडा हा शहापूर तालुक्यातील १००% आदिवासी समाजाची वस्ती असलेला पाडा. त्यामुळे शाळेत येणारी मुले ही वंचित घटकाची आहेत. कार्यानुभवाच्या तासिकेला उत्पादक उपक्रमांतर्गत चला आवणी - भाताची लावणी करुया हा उपक्रम घेतला. यासाठी *रविंद्र जानू रेरा* यांच्या शेतात जाऊन *नांगरणे, आवण म्हणजे काय? खणणे, मूठ बांधणे, मूठ वाहणे, आवणी करणे* इ. शेतीची कामांचे प्रत्यक्ष निरीक्षण करुन प्रात्यक्षिके  करुन घेतली.
यासाठी *रवी रेरा, वनिता रेरा, कविता रेरा, गुरुनाथ रेरा, सचिन रेरा, बेबी रेरा* यांनी मार्गदर्शन केले.
आनंदाची बाब म्हणजे *इयत्ता दुसरीच्या* विद्यार्थ्यांनी देखील उत्तम प्रकारे आवणी केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी रवी रेरा यांना काही प्रश्न विचारुन माहिती घेतली. एकप्रकारे  *अनौपचारिक मुलाखतच* घेतली. 
भारतीय शेती व शेतकऱ्यांविषयी आत्मियता, श्रमप्रतिष्ठा इ. गुणांचा विकास होऊन भूगोल आणि कार्यानुभव विषयांचा सहसंबंधाद्वारे उपक्रम घेण्यात आला.

उपक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची मुलाखतीचा काही भाग पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

https://youtu.be/GeAGF0pPiIA

सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचा पाडा
केंद्र-सापगाव, ता- शहापूर 
जि- ठाणे.






आज दि. १९ जुलै २०१९ रोजी *महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ अंतर्गत मुंबई विभागीय मंडळ, वाशी, नवी मुंबई येथे इ. ५ वी व इ. ८ वी* मध्ये प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी *मुल्यमापन परीक्षा पद्धती व मुल्यमापन आराखडा इ.* बाबतीत संपर्क केंद्र समन्वयकांना मार्गदर्शन करण्यात आले सोबत जगदिश इंदलकर सर होते. केंद्र समन्वयकांनी विचारलेल्या शंकेचे निरसन तज्ञांनी केले. 

या सभेस *विभागीय सचिव मा. शरद खंडागळे साहेब , अध्यक्ष कृष्णकुमार पाटील साहेब , सहसचिव श्री सांगवे साहेबांनी*  उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील *प्रत्येक मूल शिकावे* यासाठी मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना झाली. शिक्षण क्षेत्रातील हे एक स्वागतार्ह पाऊल. मुक्त विद्यालयाद्वारे प्राथमिक शिक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे याचा अभिमान वाटतो. यासाठी *आ. प्राची साठे मॕडम, शकुंतला काळे मॕडम* यांनी खूप मेहनत घेतली. जुलै ते डिसेंबर व डिसेंबर ते जुलै असे वर्षभरात दोन टप्पे आहेत. दि. २२ जुलै ते ३ आॕगस्ट या कालावधीत संकलीत मूल्यमापन करायचे आहे. पहिल्या वर्षातील पहिल्या टप्प्याच्या कार्यवाहीत माझा  देखील खारीचा वाटा आहे याचा मला अभिमान वाटतो. मूल शिकावे व शिक्षण प्रवाहात टिकून राहणे यासारखा दुसरा आनंद काय असेल?

वंचित मुले, कलावंत मुले, खेळाडू मुले इ . मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळावा, त्याने घरी अभ्यास करुन परीक्षा देऊन शिक्षण घ्यावे तसेच कौटुंबिक अडचण किंवा इतर कारणाने शाळाबाह्य रहाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापन झाली आहे. या योजनेची जाहीरात करुन जास्तीतजास्त शाळाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात आणणे हे माझे सामाजिक कर्तव्य आहे. चला तर मग आपल्या परिसरातील, गावातील जास्तीतजास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुयात. पुढच्या टप्प्यात जास्तीतजास्त मुलांची नोंदणी करुयात.

 सौ. ज्योती दिपक बेलवले.

h


#क्षण_आनंदाचे

आज दिनांक 16 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण  केंद्र मुंबई येथे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.विनोदजी तावडे साहेब यांनी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी मागील काळातील चार शिक्षणमंत्री  *मा.वसंत पुरके साहेब,मा.बाळासाहेब थोरात साहेब,मा.हसन मुश्रीफ साहेब स्वतः तावडे साहेब व विद्यमान शालेय शिक्षण मंत्री मा.आशीषजी शेलार साहेब,तसेच मा.प्राची साठे मॅडम कार्यासन अधिकारी शिक्षण मंत्री यांची उपस्थिती होती.*
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण सचिव मा.वंदना कृष्णा मॅडम ,शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब ,माजी शिक्षण सचिव नंदकुमार साहेब,शिक्षण संचालक माध्य.मा दिनकर पाटील, SSC बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे,माजी शिक्षण संचालक मा.सुनील मगर,गंगाधर म्हमाणे, सिद्धेश वाडकर,शिक्षणाधिकारी बी.बी चव्हाण,मीना शेंडकर,BEO अश्विनी सोनवणे,तसेच काही NGO प्रतिनिधी,मंत्रालयीन अधिकारी नानवटे साहेब, अंकुश बोबडे साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी  राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिकज्योती बेलवले, उपक्रमशील शिक्षक भरत काळे व विक्रम अडसूळ (मला) निमंत्रित केले होते.

यावेळी एकाच वेळी महाराष्ट्राला लाभलेले पाच शिक्षण मंत्री तसेच आजी माजी शिक्षण सचिव ,शिक्षण संचालक यांचे सोबत अनौपचारिक गप्पा झाल्या. *यावेळी Active Teachers Maharashtra (ATM)च्या कामाचे कौतुक सर्वांनी करून भविष्यातही ATM ने राज्यासाठी दिशादर्शक काम करावे असे नवनियुक्त शिक्षण मंत्री यांनी आवाहन करून ATM टीम सोबत लवकरच चर्चा करण्यासाठी मिटिंग आयोजित करू असे सांगितले.*







*इयत्ता - ६ वी*
*विषय - सा. विज्ञान* 
*घटक - नैसर्गिक संसाधने हवा, पाणी, जमीन*
*उपघटक - जमिनीचे थर*
*साहित्य - बरणी, दगड, वाळू, माती, पालापाचोळा, पाणी इ.*

जमिनीचे थर दाखवण्यासाठी वृक्षारोपणासाठी खणलेले खोल खड्ड्यांचे निरीक्षण करण्यास सांगितले. वर्गात चर्चा घेऊन जमिनीचे थर समजावून सांगितले. वर्गातील बरणीत वाळू, दगड,पालापाचोळा, माती टाकून त्यात पाणी टाकून ते काडीने ढवळले. दुसऱ्या दिवशी बरणीचे निरीक्षण करुन जमिनीचे थर चर्चेद्वारे स्पष्ट केले. प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने अधिक माहिती दिली. 

सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचा पाडा
केंद्र-सापगाव, ता- शहापूर 
जि- ठाणे.




*AIL activity - अभ्यास मेंदी*

*इयत्ता - ६ वी*
*विषय - गणित* 
*घटक - भूमितीतील  मूलभूत संबोध*

*साहित्य - पेन आणि मेंदीचा कोन*

आज सहावी गणित विषयातील भूमितीतील मूलभूत संबोध दगडांच्या रांगोळ्यांद्वारे स्पष्ट केले. *बिंदू , रेषाखंड, रेषा, किरण, छेदणाऱ्या रेषा, समांतर रेषा आणि प्रतल* हे संबोध आकृतीद्वारे स्पष्ट केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातावर मेंदीने मूलभूत संबोधाच्या आकृती काढून त्या आकृतीचे नाव विद्यार्थ्यांना विचार करुन लिहण्यास सांगितले . रेषाखंड, रेषा, किरण यातील फरक निरीक्षणाने ओळखण्यास सांगितले. हातावर काढलेली मेंदी आठवडाभर राहिल. 
*आकृत्यांची नावे मुद्दाम पेनने लिहिली कारण त्यांचा लेखनाचा सराव मेहंदी पुसेपर्यंत नियमित होईल.* मुले ह्या आकृत्या घरी देखील पाहतील. नकळतपणे सराव होऊन दृढीकरण होईल. माझ्या मुलांसाठी हा वेगळा अनुभव होता. ते हसतखेळत गणित शिकली.

 सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.प्राथ.शाळा दोऱ्याचा पाडा
केंद्र-सापगाव, ता.शहापूर       जि- ठाणे.





हिरेन मेहता यांचे खूप खूप धन्यवाद.
त्यांनी संपूर्ण देशभरातून सहा शिक्षकांची निवड त्यांच्या #चित्रलेखा_गुजराथी या मासिकात 
#हे_आहेत_आमचे_सुपर_शिक्षक म्हणून केली. 
आणि त्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला चित्रलेखा सारख्या अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले.माझ्यासोबत ठाणे येथील #उपक्रमशील_राष्ट्रपती_पुरस्कारप्राप्त_शिक्षिका_ज्योती_बेलवले यांचा ही समावेश आहे.
हे सर्व श्रेय आपणा सर्वांचे आहे.तुम्हा सर्वांसोबत मी समृद्ध होत आहे याचा अभिमान वाटतो.
🙏🙏🙏




आज दि.१ जुलै २०१९ रोजी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी शा.व्य.स.चे अध्यक्ष श्री.तुकाराम रेरा व इतर सदस्य, ग्रामस्थ तसेच पवार मॕडम, डोंगरे मॕडम, बेलवले मॕडम आणि शिंदे मॕडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात हिरवी काया हिरवी माया या गीताने केली. गावात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धासाच्या जागृतीसाठी वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीसाठी ग्रामपंचायतीकडून मिळालेली झाडे,  कुंडीत लावलेले झाड व ज्या झाडांची फांदी रुजते अशा झाडाची फांदी घेऊन घोषणांच्या गजरात दिंडी काढली. 
खणलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करण्यात आले. मुलांनी झाडे लावली. वृक्षसंवर्धनाबाबत माहिती दिली.वृक्षारोपणावरील गीते,प्रतिज्ञा, शालेय कविता सादर करण्यात आल्या. यावेळी *तर ची जादू* हा वृक्षसंवर्धनावर आधारित उपक्रम घेण्यात आला.शाळेच्या परिसरात, आजूबाजूला एकूण ७१ झाडे लावण्यात आली.

  
    सौ.ज्योती दिपक बेलवले.
    जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचा पाडा
    केंद्र-सापगाव, ता- शहापूर 
    जि- ठाणे.





*NCERT नवी दिल्ली* येथे  देशभरातील शिक्षकांसाठी हस्तपुस्तिक लेखनाची संधी मिळाली. ही निवड म्हणजे स्वतःला समृद्ध करण्याची संधी. दिनांक 22 ते 26 जून 2019 या काळात
NCERT मध्ये काम करताना खूप काही शिकता आले. देशातील निवडक शिक्षकांमधून माझी या कार्यासाठी झालेली निवड म्हणजे सुखद धक्काच..
वेगळा विचार..वेगळे ज्ञान..
नियोजनबद्ध कार्यक्रम ..तज्ञांचे मार्गदर्शन ..
अशा कितीतरी अनुभवांनी मी समृद्ध झालेय..
*धन्यवाद ATM समुह आणि  NCERT नवी दिल्ली.*
🙏🙏




मी आज शाळेत अनियमित असणाऱ्या मुलांच्या घरी मुख्याध्यापिका कासार मॕडमसोबत भेट दिली. आमच्या शाळेत इ. ६ वी आणि ७ वीत *रास* या शेजारच्या गावातून मुले येतात. परंतु ती अनियमित असल्याने गृहभेट देऊन पालकांचे उद्बोधन केले व या सर्व मुलांना शाळेत आणले. या मुलांच्या मानसिकतेचा विचार करुन आनंददायी वातावरणात अध्यापन केले. मुलांच्या आवडीची सायकल आणून ती चालवणे, गप्पा, गाणी, गोष्टी याद्वारे शाळेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
              

       सौ.ज्योती दिपक बेलवले.
     जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचा पाडा
        केंद्र-सापगाव, ता- शहापूर 
                    जि- ठाणे.







आज दि. १७ जून रोजी जि.प.शाळा 
 दोऱ्याचापाडा, केंद्र-सापगाव, ता- शहापूर, जि- ठाणे येथे प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत उत्साहात  साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी गावाचे सरपंच, व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख अरुण मडके सर, माता पालक संघ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

शालेय स्वच्छता करुन शिक्षणावर आधारित रांगोळी काढली. गावात पटनोंदणी फेरी काढून घोषवाक्यांच्या द्वारे शिक्षणाबद्दल जागृती करुन वातावरणनिर्मीती केली.विद्यार्थ्यांना वाजतगाजत शाळेत आणण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका कासार मॕडम,पवार मॕडम, डोंगरे मॕडम, ज्योती मॕडम आणि  शिंदे मॕडम यांनी वर्गसजावट करुन इ.१ ली तील ननवांगतांच्या स्वागतासाठी औक्षण करुन *पहिले पाऊल* हा उपक्रम राबवला गेला. यात इ. १ ली तील नवीन विद्यार्थीच्या लाल रंगात पावलांचा ठसा कागदावर घेऊन त्याखाली तो पावलाचा ठसा ज्याचा आहे त्याचे नाव लिहण्यात आले. विद्यार्थ्यांना रंगबेरंगी फुगे, गुलाबपुष्प, चाॕकलेट, बिस्किट, पाठ्यपुस्तक आणि लेखनसाहित्य दिले. मुलांच्या चेहऱ्यावर गंमत आणि वेगळाच आनंद दिसत होता. यावेळी पटनोंदणीवर आधारित गीतांचे गायन घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे कृतियुक्त गीत घेऊन खेळ घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले.
दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना  वरण,भात, भाजी आणि तांदळाची खीर देण्यात आली. एकदंरीत खूप उत्साहात व आनंदाने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

             
          सौ.ज्योती दिपक बेलवले.
       जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचा पाडा
           केंद्र-सापगाव, ता- शहापूर 
                       जि- ठाणे.







No comments:

Post a Comment