जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday, 9 July 2022

शुद्धलेखन नियम

 

शुद्धलेखन नियम

RULES ..
या लेखात र्‍हस्व-दीर्घ संबंधित व्याकरणातील बहुतेक नियम 
सांगितले आहेत.
र्‍हस्व – दीर्घ (अन्त्य अक्षरे)
१) एकाक्षरी शब्दातील इ-कार किंवा उ-कार दीर्घ उच्चारला 
जातो म्हणून तो दीर्घ लिहावा:
उदा.
 मी, ही, ती, जी, तू, जू, पू, इत्यादी.

२) मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इ-कार किंवा उ-कार
 उच्चारानुसार दीर्घ लिहावा:
उदा.
 आई, ताई, पट्टी, ताटली, वही, पेटी, वाळू, बंडू, बाळू,
 चेंडू, दारू इत्यादी.

३) कवि, हरि, मधु, गुरु, वायु, प्रीति यांसारखे तत्सम (र्‍हस्व)
 इ-कारान्त व उ-कारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घान्त
 उच्चारले जातात म्हणून तेही दीर्घान्त लिहावेत:
उदा. बा.भ. बोरकर हे कवी आहेत.
हरी आणि मधू हे माझे मित्र आहेत.
द्रोणाचार्य हे पांडवांचे गुरू होते.
मी तुझ्या प्रीतीत हरवलोय गं..

४) व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे शब्द (संस्कृतातून मराठीत 
जसेच्या तसे आलेले) जरी मुळात र्‍हस्वान्त असले तरी मराठीमध्ये ते 
दीर्घान्त लिहावेत:
उदा. हरी, अन्योक्ती, अतिथी, विभक्ती, संधी, कुलगुरू, इत्यादी.

५) पण जर सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (र्‍हस्व) इ-कारान्त
 किंवा उ-कारान्त तत्सम (काही) शब्द असेल तर ते र्‍हस्वान्तच लिहावेत:
उदा. कविराज, लघुकथा, वायुपुत्र, मृत्युलेख, गुरुदक्षिणा, भक्तिपर, हरिकृपा, शत्रुपक्ष, पशु-पक्षी, रविवार, 
भानुविलास, गतिमान इत्यादी.

६) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद (दीर्घ) इ-कारान्त किंवा उ-कारान्त 
तत्सम शब्द असेल तर ते दीर्घान्तच लिहावे:
उदा. लक्ष्मीपुत्र, महीपाल, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरीक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन, वधूवर, श्रीधर, नदीतीर,
 भगिनीमंडळ इत्यादी.

७) विद्यार्थि‍न्, प्राणिन्, पक्षिन्, यांसारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतांना त्यांच्या शेवटच्या
 ‘न्’ चा लोप होतो व उपान्त्य र्‍हस्व अक्षर दीर्घ होते.
उदा. विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री, गुणी, धनी, योगी, स्वामी

८) पण जर हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर ते र्‍हस्वान्तच ठेवावे:
उदा
. विद्यार्थिगृह, प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रिमंडळ, स्वामिभक्त, योगिराज इत्यादी.

९) पुढील तत्सम अव्यये व ‘नि’, ‘आणि’ ही दोन मराठी अव्यये र्‍हस्वान्तच लिहावीत:
उदा.
 परंतु, अद्यापि, तथापि, अति, इति, प्रभृति, यद्यपि, यथामति, नि, आणि इ.

(सुचना. ‘इत्यादी’ हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घान्त लिहावा.)
र्‍हस्व – दीर्घ (उपान्त्य अक्षरे)

१) मराठी शब्दांतील अ-कारान्तापूर्वीचे इ-कार व उ-कार दीर्घ असतात:
उदा.
 खीर, पीठ, फूल, सून, गरीब, कठीण, नाईक, हुरूप, विहीर, दीर, नीट, मूल, ऊस, बहीण, जमीन, ठाऊक, वसूल इत्यादी.

२) पण तत्सम शब्दांतील अ-कारान्तापूर्वीचे इ-कार व उ-कार मूळ संस्कृतात असल्याप्रमाणे र्‍हस्वच राहतात:
उदा.
 गुण, युग, विष, प्रिय, मधुर, मंदिर, अनिल, परिचित, स्थानिक, बुध, सुख, हिम, शिव, कुसुम, तरुण, रसिक, नागरिक, सामाजिक इत्यादी.

३) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ-कार किंवा उ-कार असतो:
उदा.
 किडा, गुणी, पिसू, मेहुणा, सरिता, वकिल, पाहिजे, मिळवितो, दिवा, सुरी, सुरू, तालुका, गरिबी, महिना, ठेविले, फसविले इत्यादी.

४) पण तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतात असल्याप्रमाणेच दीर्घ ठेवावी. वरील नियम क्र. ३) प्रमाणे ती र्‍हस्व ठेवू नयेत:
उदा.
 पूजा, भीती, प्रीती, पूर्व, दीप, पीडा, नवीन, संगीत, लीला, नीती, कीर्ती, चूर्ण, नीच, क्रीडा, शरीर, परिक्षा इत्यादी.

संदर्भः “सुगम मराठी व्याकरण लेखन”
लेखक: कै. मो.रा. वाळंबे
नितीन प्रकाशन, पुणे – ३०

No comments:

Post a Comment