अन् शाळेला पाणी मिळाले…
पाणी हे मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल संपत्ती आहे. मानव काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो. परंतु मानव आपले जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही.
पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे. म्हणून म्हटले गेले आहे कि, पाणी हेच जीवन आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोऱ्याचापाडा हे शहापूर तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेली शाळा. या शाळेत पाण्याची सोय नव्हती. दोऱ्याच्यापाडा या वस्तीची ग्रामपंचायत हीव आहे. हिव हे गाव खालच्या बाजूला व दोऱ्याचापाडा ही वस्ती उंचावर टेकडीवर वसलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून येणारे पाणी कमी फोर्सने गावात येते. आमची शाळा गावाच्या वेशीवर आहे, त्यामुळे पाणी प्रथम गावात आणि नंतर पुढे येते. शाळेत पाणी यावे म्हणून शाळेसाठी वेगळा कॉक दिला आहे. गावातील लोक शाळेकडे येणारा कॉक बंद करून संपूर्ण पाणी गावात वापरत असत.
शाळेत पोषण आहार शिजवणाऱ्या जया ताई व सुमन ताई ताई गावातून पाणी वाहून आणून शाळेसाठी पाण्याची सोय करत असत, पण त्यामुळे पाणी वापरावर निर्बंध येत होते. अशा अवस्थेत देखील आम्ही सर्वांनी मिळून शाळेमध्ये पावसाळ्यात परसबाग तयार करून त्यात फुलझाडं, फळझाड आणि भाज्यांची लागवड करून त्यांचा पोषण आहारामध्ये वापर करत होतो.
शाळेला पाणी मिळावे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम आणि इतर सर्व शिक्षक प्रयत्न करत होते, परंतु यश येत नव्हते. हीव ग्रामपंचायतीतील प्रशासक कळसकर सर यांनी शाळेला पाणी मिळावे म्हणून शाळेपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन टाकून दिली त्यामुळे शाळेला किमान आठवड्यातून एकदा तरी पाणी मिळू लागले. पाणी साठवण्यासाठी लोकसहभागातून एक हजार लिटरची टाकी व हँडवॉश स्टेशन तयार करण्यात आले, परंतु मिळणारे पाणी देखील 122 विद्यार्थ्यांना अपुरे पडत होते.
आठवड्यातून किमान तीन वेळा तरी पाणी यावे अशी आमची माफक अपेक्षा होती परंतु ती पूर्ण होत नव्हती. आम्ही सर्वजण आता त्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्हा सर्वांची पाण्यासाठी वणवण सुरू होती.
जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी कुपनलिका योजना सुरू केली. त्यामध्ये इतर शाळांसोबत जिल्हा परिषद शाळा दोऱ्याचापाडा याचीदेखील निवड करण्यात आली. परंतु आमच्या पाण्याचा प्रवास खडतर होता. बोरवेलची गाडी येण्यासाठी शाळेजवळ असणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्या लागणार होत्या. शाळेच्या प्रवेश दारावर असणारी शाळेच्या नावाची पाटी काढावी लागणार होती. ती पाटी काढण्यासाठी लाईट असणे गरजेचे होते.
शुक्रवारी कूपनलिका बसवणारे अनिल खैरनार शाळेत आले आणि त्यांनी फांद्या व शाळेचा बोर्ड काढण्याची सूचना केली. खूप पाऊस झाल्याने व शुक्रवार असल्याने दिवसभर गावात लाईट नव्हती, त्यामुळे शाळेचा बोर्ड काढणे शक्य झाले नाही. कूपनलिका खोदण्याची मुदत ही ३० जून पर्यंतच असल्याने आम्ही सर्वजण आटापिटा करत होतो. शनिवारी सकाळी प्रकाश भाऊंनी शाळेचा बोर्ड काढला व गावातील एका व्यक्तीकडून झाडाच्या फांद्या छाटून घेतल्या.
आता पाण्याचा पॉईंट शोधणे हे महत्त्वाचे काम करायचे होते, परंतु पाण्याचा पॉईंट शोधावा कसा? काहीजण म्हणाले," नारळ घेऊन शोधूयात ." परंतु नारळ घेऊन पाणी शोधणारा माणूस सकाळीच कामाला गेल्याने आमच्या अडचणीत वाढ झाली. आता पाण्याचा पॉईंट कसा शोधावा हा आमच्यासमोर यक्षप्रश्न होता. अशावेळी मोबाईल मधील टेक्नॉलॉजी उपयोगात आली. underground water leakage sensor हे ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घेतले. या ॲपद्वारे पाणी शोधायला सुरुवात केली. एकूण तीन पॉईंट शाळेच्या परिसरात सापडले. त्यापैकी सर्वात स्ट्रॉंग पॉईंट ची निवड आम्ही सर्वांनी मिळून केली. नारळ आणून पुन्हा खात्री देखील करून घेतली. याकामी कूपनलिकेचे काम पाहणारे अनिल खैरनार यांची खूप मदत झाली. हे सर्व करेपर्यंत अकरा वाजले होते यानंतर बोअरवेल खोदणारी गाडी येणार होती .गाडी यायला साडेबारा झाले. साडेबारा नंतर खोदकाम सुरू झाले. गावातील काही व्यक्ती, शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, डोंगरे मॅडम, सहकारी, विद्यार्थी सर्वजण डोळे लावून पाणी पाहण्यासाठी आतुर होते, परंतु संध्याकाळचे चार वाजले तरी पाणी काही लागेना. गावातील लोक कुजबूज करु लागली. 'नीट पॉईंट शोधला होता ना . असा कसा पॉईंट घेतला अजून पाणी लागत नाही.' सर्वजण टेन्शन मध्ये होते. परंतु दोऱ्याच्यापाडा शाळेच्या पाण्याची देवाक काळजी आणि ssssss पाणी लागले. संध्याकाळी साडेचारला 220 फुटावर पाणी लागले. ते पाहून दिवसभर केलेले कष्ट कुठल्या कुठे पळून गेले.
आता शाळेला पाणी मिळालंय, स्वतःचं पाणी, शाळेचे पाणी यासाठी पंचायत समिती शहापूर आणि जिल्हा परिषद ठाणे यांचे खूप खूप धन्यवाद !
सौ. ज्योती दिपक बेलवले.
जि. प. शाळा दोऱ्याचापाडा,
केंद्र - सापगाव, ता - शहापूर,
जि - ठाणे.
No comments:
Post a Comment